पुणे : पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. हडपसर ते दिवे घाट दरम्यान आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत रस्त्यावरील खडकांचे भंजन (ब्लास्टिंग) केले जाणार असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

कामादरम्यान उडणारे दगड आणि ढिगाऱ्यांमुळे वाहनचालक किंवा प्रवाशांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.हडपसर ते दिवे घाट हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. दररोज हजारो वाहने या मार्गाने ये-जा करतात. दुपारी 12 ते 2 या वेळेत रस्ता बंद राहणार असल्याने घाटाच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांनी दिवे घाटातून जाणे टाळावे. अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होईल. मात्र, सध्या चालू असलेल्या कामाच्या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.







