पुणे : राज्य उन्हात होरपळत असून, रविवार, ५ मे रोजी राज्यातील सर्वांत जास्त उच्चांकी तापमानाची नोंद सोलापूर व अकोला येथे ४४.४ अंश सेल्सिअस आहे. दरम्यान, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा, तर काही भागांत उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड ते पश्चिम बंगालमधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.
त्यामुळे राज्यात काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ होत आहे. तसेच, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. अनेक नागांचे तापमान ४० अंशांच्या पुढे असून, दिवसा गरम वारे वाहत आहेत. येत्या ६ ते ११ मे रोजीदरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे. तर, मराठवाड्यात ६ ते ७ मे रोजी व विदर्भात ६ ते ९ मे रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा वाहणार आहे.
प्रमुख जिल्ह्यांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे -४०.३, जळगाव- ४२.२. कोल्हापूर- ३८, महाबळेश्वर-३३.१, मालेगाव -४२.८, नाशिक -३८, सांगली -४१, सातारा -४०.७, सोलापूर -४४.४, मुंबई -३३.६, सांताक्रुझ -३४.८, रत्नागिरी -३३.५, डहाणू -३५:८, छत्रपती संभाजीनगर -४१.६, परभणी -४३.७, नांदेड- ४२.८, बीड-४२, अकोला -४४.४, अमरावती -४३.६, बुलडाणा -३९.६, ब्रह्मपुरी -४३.९, चंद्रपूर -४४.२, गोंदिया -४१.३, नागपूर -४३, वाशिम- ४३.२, वर्धा- ४४, यवतमाळ- ४२.५.