पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज (८ ऑगस्ट) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये हवामानात बदल जाणवत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विशेषतः पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे.

पुणे शहरातही आज आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, मुंबई, पुणे आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली असून, पावसाच्या खंडामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत येणारा पाऊस पिकांना दिलासा देईल अशी अपेक्षा आहे.







