लहू चव्हाण
Rain पाचगणी : ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु असल्याने पर्यटक आनंदीत झालेत. परंतु सलग दोन दिवस गारपिटीसह जोरदार पडणाऱ्या पावसाने (Rain) स्ट्रॉबेरी सह इतर पिकांना फटका बसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत.
स्ट्रॉबेरी पीक धोक्यात…!
जोरदार गारांच्या वर्षावाने स्ट्रॉबेरी शेतीत बर्फाची चादर पसरल्याने स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आले असून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे गेला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
महाबळेश्वर तालुका हा दुर्गम भाग असून येथील मुख्य पीक स्ट्रॉबेरी असून या पिकावर येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते. भिलार,गोडवली,खिंगर,राजपुरी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पीक घेतले जाते. तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड होते. त्यातील भिलार परिसरात सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रात लागवड होते.
दरम्यान, गेली दोन दिवस पडणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीने परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशी सह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने फळे व स्ट्रॉबेरीच्या रोपांची पाने खराब झाली असल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यावेळी बोलताना स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दादा भिलारे म्हणाले कि, अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या मुख्य पर्यटन हंगामात स्ट्रॉबेरी उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.