पुणे : शहरात पाऊस सक्रिय असून, पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १४) शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस शहरात पावसाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे उन्हाचा चटका, ढगाळ हवामान आणि पाऊस असे वातावरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी शहरात कमाल तापमानाचा पारा ३७.१ अंश सेल्सिअस इतका होता. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता.
दुपारनंतर आकाश ढगाळ होऊन शहराच्या काही भागात पाऊस पडला. दरम्यान, पुढील काही दिवस पाऊस व ढगाळ हवामानामुळे त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असलातरी उन्हाचा चटका व उकाडा जाणवत आहे. किमान तापमानात चढउतार सुरू असून, मंगळवारी किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअसवर इतके होते. येत्या १५ ते १६ मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर १७ मे रोजी आकाश काही काळ ढगाळ राहणार आहे.