पुणे :जुलैच्या सुरुवातीला तुफान हजेरी लावल्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. आता महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.येत्या 20जुलैपासून पावसाचा जोर वाढणार असून 16 जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलांमुळे नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख शहरांसह राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विदर्भातील काही भागांत आज जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. नागपूरसह आसपासच्या परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे शहरात आणि जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
राजधानी मुंबईत आज आकाश पूर्णपणे ढगाळ राहील. मुंबई आणि परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील.
मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो.
एकंदरीत, राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव अधिक जाणवणार असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच आपल्या कामांचे नियोजन करावे. विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.







