पुणे: मान्सूनची प्रगती सुरू असून, त्याने मंगळवारी अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांत प्रगती केली. तर, राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळपर्यंत सक्रिय आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मान्सूनची सीमा मंगळवारी मुंद्रा, उदयपूर, शिवपुरी, सिद्धी, चैबसा, हल्दीया, पाकूर, साहीवगंज आणि रक्सौल भागात होती. मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान पोषक आहे, त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांत दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.