पुणे : महाराष्ट्रातील काही भागांला रविवारी (ता. 5) पावसाने चांगलेच झोडपले आहे. हिमालयात सक्रिय झालेल्या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम आता राज्यावर होताना दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून 8 मार्चपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हिमालयात सलग दोन पश्चिमी चक्रवात तयार झाले असून त्या भागात जोरदार पाऊस व हिमवर्षाव सुरू झाल्याने उत्तर भारतातून हे गार वारे ताशी 55 कि.मी. वेगाने महाराष्ट्राकडे येत आहेत. त्याचा परिणाम रविवारी सकाळपासून दिसला. राज्याच्या अनेक भागांत सकाळपासूनच गार वारा वाहू लागला. येत्या तीन दिवस 8 मार्चपर्यंत राज्यातील सर्वच भागांत असे वातावरण असेल. किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होऊन गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे.
कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात रविवारपासून ते बुधवार (ता. 8) पर्यंत गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची तर मंगळवारी (ता.7) गारपिटीची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवा पासून दुपारच्या कमाल व पहाटेच्या किमान तापमानात घसरण होऊन उष्णतेची काहिली कमी होईल. अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.