पुणे : शहरात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून, मंगळवारी (दि.२) शहर परिसरात दमदार पाऊस पडला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार असून, घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस पडला होता. त्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर शहरात अपेक्षित पाऊस पडला नाही. मात्र, सध्या पावसाला अनुकूल वातावरण झाल्यामुळे पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. मागील दोन दिवस शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर आणि जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे.
मंगळवारी शहर परिसरात दमदार पाऊस पडला आहे. सायंकाळपर्यंत पाषाण येथे १५.४ मि.मी. पाऊस पडला. तसेच शिवाजीनगर १२.६, वडगावशेरी १२, मगरपट्टा ४, लोहगाव ६ मि.मी. पाऊस पडला. तसेच, एनडीए, हडपसर, कोरेगाव पार्क येथे अनुक्रमे ०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. येत्या ३ ते ८ जुलैदरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.