पुणे : शहरात आकाश काही काळ ढगाळ असून, पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार आहे. दरम्यान, तापमानात वाढ होऊन सोमवारी (दि.२२) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.४ अंशांवर होते. गेल्या आठवड्यात सलग पडलेल्या पावसामुळे कमाल तापमान घटले आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रात्रीचाही उकाडा कमी झाला आहे. सध्या शहरावर कमी दाबाचा पट्टा कार्यरत असल्यामुळे आकाश अंशतः ढगाळ राहत आहे.
रविवारच्या तुलनेत सोमवारी कमाल व किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. सोमवारी कोरेगाव पार्क येथे ४०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. तर, वडगावशेरी ४०.४, मगरपट्टा ४०.३, पाषाण ३८.८ व एनडीए येथे ३८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे. येत्या २३ ते २८ एप्रिल रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ राहणार आहे. यादरम्यान कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.