पुणे: मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी पुणेकर (Pune Weather) उकाड्याने हैराण झाले असतानाच हवामानाने अचानक कूस बदलली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, 31 मार्च रोजी पुणे जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी दुपारनंतर पाषाण, कोथरूड आणि हिंजवडी परिसरात झालेल्या पावसाने आधीच वातावरणात बदल घडवून आणला असून आज पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.

आज पुण्यातील कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान तापमान 22 अंशांपर्यंत राहील. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 40 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात.
हवामान तज्ज्ञांच्या मते, हा अवकाळी पाऊस शेतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. विशेषतः द्राक्ष, आंबा आणि काढणीला आलेल्या पिकांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांत पाषाणमध्ये सर्वाधिक 46 मिमी पावसाची नोंद झाली असून लोहगाव आणि शिवाजीनगर परिसरातही हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.







