नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता एका नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. एसआयटीच्या (SIT) तपासात समोर आलेली माहिती कोणत्याही क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नसून अशोक खरात हा श्रीमंतांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घ्यायचा. त्याच्या भक्तगणांमध्ये सामान्य माणसाला स्थान नव्हते; तो केवळ बडे सनदी अधिकारी, राजकारणी आणि उद्योगपतींना लक्ष करत होता. विशेष म्हणजे, अमावस्या किंवा पौर्णिमेला ‘आऊटडोअर व्हिजिट’साठी खरात तब्बल 5 लाख रुपये घेत असे. पुण्याच्या एका ‘करोडपती’ भक्ताला तर त्याने चक्क 90 लाखांची लक्झरी कार स्वतःच्या नावावर खरेदी करायला भाग पाडले गेल्याचे तपासात समोर आले आहे.

खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील आलिशान कार्यालयात तांत्रिक विधींच्या नावाखाली नको ते कृत्य सुरु होते. एसआयटीने नुकतेच पीडित महिलांना सोबत घेऊन या ठिकाणी ‘सीन रिक्रिएशन’ केले. तपासात तिथे काही संशयास्पद औषधे आणि मौल्यवान रत्ने सापडली आहेत.
अशोक खरातची पोलीस कोठडी उद्या, 1 एप्रिल रोजी संपत आहे. आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता या भोंदूच्या साम्राज्याचा शेवट करण्यासाठी कोणते ठोस पुरावे न्यायालयात सादर करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







