पुणे: पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून (Pune Weather) सुरू असलेल्या कडक उन्हाच्या झळानंतर अखेर हवामानात मोठा बदल झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांना कडाक्याच्या उष्णतेपासून आणि उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी शहरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले होते.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यांच्या वर ढगांची दाटी निर्माण झाली होती. या प्रणालीमुळे संध्याकाळच्या वेळी शहरात वेगवान वारे आणि विजांसह पावसाने धुवांधार बॅटिंग केली. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील चंचवड भागात अवघ्या दोन तासांत सर्वाधिक 60 मिमी पावसाची नोंद झाली, तर शिवाजीनगर येथे १३.१ मिमी पाऊस नोंदवला गेला. गेल्या 50 दिवसांतील हा पहिलाच मोठा पाऊस असल्याने तापमान कमालीचे खाली आले आहे.

अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. चिंचवड, हिंजवडी, कोंढवा, कात्रज, शिवाजीनगर, हडपसर, वारजे आणि कोथरूड या भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. ऐन कार्यालयातून घरी परतण्याच्या वेळेतच पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही समोर आल्या असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रस्ते मोकळे करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान, आज शनिवार, 23 मे रोजीदेखील पुण्यात पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पुण्याचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळू शकतात, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन आणि आवश्यक ती काळजी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







