पुणे : मान्सूनचा परतीचा प्रवास थांबल्यामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. राज्यात अकोला येथे मंगळवारी ३५.८ कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला होता, तो आता ओसरू लागला आहे. गेल्या आठवड्यात राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर सलग सहाव्या दिवशीही मान्सूनने आपला मुक्काम कायम ठेवला होता.
आजही मान्सूनचा प्रवास थबकलेला आहे. पाऊस थांबल्यामुळे हवामान कोरडे होत असून अनेक भागांत कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांचे तापमान ३२ अंशाच्या पुढे गेले असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यामध्ये मंगळवारी मुख्यतः पावसाने विश्रांती घेतली. महाबळेश्वर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, ब्रह्मपुरी येथे पावसाची नोंद झाली. येत्या २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान राज्यात तुरळक पाऊस पडणार आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.