पुणे: महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहते असलेल्या मान्सूनचे यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी आगमन होणार आहे. नैऋत्य मान्सून यंदा केरळमध्ये ३१ मेपर्यंत धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने बुधवारी व्यक्त केला. मान्सूनच्या आगमनाबरोबर देशात चार महिन्यांच्या पावसाच्या हंगामाला सुरुवात होईल. कृषिप्रधान भारतासाठी वेळेवर मान्सून दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये ३१ मे रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.
मान्सूनचे आगमन लवकर नसून सामान्य तारखेच्या जवळ आहे. कारण केरळमध्ये सामान्यतः १ जून रोजी मान्सून दाखल होत असतो, असे महापात्रा म्हणाले. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने गत महिन्यातच वर्तवला होता. शेतीसाठी जून आणि जुलै महिन्यातील पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण याच काळात खरीप पिकांच्या बहुतांश पेरण्या केल्या जातात. एल निनो कमजोर होऊन ला निनाची परिस्थिती निर्माण होत असल्याने यंदा ांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गतवर्षीपेक्षा चांगला असल्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे.