Maharashtra Weather Update : पुणे : राज्यात मान्सूननं परतीची वाट धरल्यानंतर अवकाळीचं सावट पहायला मिळत आहे. या अवकाळीनं शेतकऱ्यांना रडकुंडीस आणलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही पहाटेपासूनच राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आजही पावसाचा यलो अलर्ट राज्यातील काही भागांमध्ये देण्यात आला आहे. भुसावळमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही मध्यरात्रीपासूनच मुसळधार अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आणि गारपिटीचा शक्यता आहे. यासह विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
आयएमडीने पुण्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नजीकच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत कायम आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मात्र शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे. संपूर्ण विदर्भातील 11 आणि खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगांव अशा तीन जिल्ह्यासहित एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.