Maharashtra Weather : पुणे : हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते. धुक्यांमुळे 200 मीटर पर्यंतही दिसत नव्हतं. दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता नाशिकच्या येवला शहरासह परिसरात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे. जळगावमध्ये तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरलं आहे.
दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे.