Maharashtra Weather : छत्रपती संभाजीनगर : नाताळपर्यंत कोकणात तापमानाचा किमान पारा खाली येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सर्वात कमी किमान तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान पारा खाली घसरला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशांखाली गेलं आहे. सध्या राज्यातील काही भागात थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे.
हवामानात सातत्यानं बदल
यवतमाळ जिल्ह्यात 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 9.4, गोंदिया जिल्ह्यात 9.2, नागपूर जिल्ह्यात 9.8, वाशिम जिल्ह्यात 9.8, बुलढाणा जिल्ह्यात 11, ब्रह्मपुरी जिल्ह्यात 11, अकोला जिल्ह्यात 11.4, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात 10.6 तापमान आहे. विदर्भाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तापमान घटल्यामुळं चांगलीच हुडहुडी भरली आहे. मध्य महाराष्ट्रातील तापमान हे 11 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
मध्य महाराष्ट्रात किती तापमान?
पुणे जिल्ह्यात 12 अंश सेल्सिअस आहे. जेऊर 12 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर 12.9 अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात 16 अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यात 14.4 अंश सेल्सिअस, अहमदनगर जिल्ह्यात 11.5 सोलापूर जिल्ह्यात 15.5 अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात 15. 1 अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात 15.8 अंश सेल्सिअस आहे.
मराठवाड्यातील हवामानात बहुंताश जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक ठिकाणी 11 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाचा पारा आहे. मराठवाड्यात देखील गारठा वाढायला सुरुवात झाली आहे.
राज्यात हळूहळू तापमानाचा पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमान 12 अंशांखाली गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममधील किमान तापमान एका अंकांवर आलं आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. विदर्भासोबतच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.