Maharashtra Weather : पुणे : बंगालच्या उपसागरात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘मिचॉन्ग’ चक्रीवादळा
दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा धोका आहे. मात्र, हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात धडकणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग सोमवारी पहाटे पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि शेजारील दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी जिल्हे सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने अद्याप हे वादळ नेमके कोठे धडकेल हे सांगितलेले नाही.
मुंबईत थंडीचा कडाका
मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झालं आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत गारठा वाढणार आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मुंबईत किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.