पुणे : राज्याच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडत असून त्याचबरोबर तीव्र उष्णताही जाणवत आहे. गुरुवारी अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान ४५.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनची दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या काही भागांमध्ये प्रगती थांबली आहे. पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. पुढील २ दिवसांमध्ये मान्सून बंगालच्या उपसागराचा दक्षिणेचा आणखी काही भाग, अंदमान आणि निकोबारचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र, श्रीलंकेच्या आणखी काही भागात प्रगती करणार आहे. दरम्यान, देशाच्या वायव्य भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणचा पारा ४० अंशांच्या वर आहे. तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात चढउतार होत आहे. येत्या २५ मे रोजी कोकणातील काही भागात मेघगर्जना व विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहणार आहे. काही भागांत उष्ण व दमट हवामान राहणार आहे.. मध्य महाराष्ट्र वादळी वाऱ्यासह पाऊस व उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच २४ ते २७ मेदरम्यान वादळी पावसाबरोबर उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.