पुणे : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून येत्या रविवार (१९ मे) च्या आसपास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि निकोबारमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण अंदमान समुद्राजवळच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे यंदा अंदमानमध्ये एक ते दोन दिवस आधी मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सून साधारण २० ते २१ मे रोजी अंदमानमध्ये दाखल होत असतो. त्यानंतर साधारणपणे २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकापासून म्यानमारपर्यंत आगमन होते. १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होऊन ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो.
मान्सून हंगामात सरासरी १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. सध्या राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. दरम्यान, आज (सोमवार, दि. १३ मे) मुंबईला वादळी वारा, पावसाने झोडपले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मान्सूनपूर्व पाऊस झाला. सायंकाळपर्यंत सांताक्रूझ येथे २० मि.मी. इतका मुसळधार पाऊस पडला आहे. येथे ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच, हवेत भरपूर धुळ पसरल्यामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. राज्याच्या इतर भागातही पाऊस सक्रिय आहे. सोमवार १३ मे रोजी महाबळेश्वर येथे १४ मि.मी., सातारा ०.५ मि.मी. पाऊस पडला आहे.
येत्या १४ ते १७ मे दरम्यान राज्यभरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान जळगाव येथे ४१.६ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.५ अंश सेल्सिअस होते.