पुणे : विविध भागात पावसाचा जोर वाढला असून, शेतकरी सुखावला आहे. आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आह्जे. बहुतांश ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
राज्यात पावसान धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. विदर्भातील काही भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण विदर्भात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागान वर्तविली आहे.
‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस.!
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना सुध्दा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबईत हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट जारी केला आहे.
चांगल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी
आजवर ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आल्याचे चित्र आहे. तसेच शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केलेली दिसून येते आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.