मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना बेजार केल्याचे चित्र आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अशातच आज पुन्हा एकदा कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसाह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारच्या सुमारास ढग दाटून येताना दिसत आहेत. त्यामुळे आज देखील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.कोल्हापूर,सातारा, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्या ‘दाना’ चक्रीवादळ घोंगावणार..
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘दाना’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. उद्या हे वादळ तीव्ररूप धारण करणार आहे. उद्या रात्री उशिरा ओडीशाच्या पुरी आणि पश्चिम बंगालच्या सागर बेटावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कुठलीहीक चिंता करण्याची गरज नाही.
दरम्यान, सोयाबीन, कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी आलेल्या सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओल्या सोयाबीनला बाजारात योग्य भाव मिळत नाही. तर दुसरीकडे, कांदा उत्पादक शेतकरी काळजीत आहेत. कांद्याच्या रोपवाटिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम हा कांदा लागवडीवर पाहायला मिळत आहे.