पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जोरदार कमबॅक केले आहे. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील हवामान बदलांमुळे महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचा जोर वाढला असून आगामी काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरनार आहेत.

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून तिथे प्रशासनाकडून ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यांच्या काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

सततच्या या मुसळधार स्वरूपामुळे किनारपट्टी भाग आणि घाट परिसरामध्ये नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मुंबईसह उपनगरांमध्येही वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहावे असे सांगण्यात आले आहे. विशेषतः घाट रस्त्यांवरून प्रवास करताना दरड कोसळण्याचा धोका असल्यामुळे वाहनचालकांनी आणि पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत.







