उरुळी कांचन, (पुणे) : उन्हाची तीव्रता आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी थंडी अशा काहीशा वातावरणामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत. फेब्रुवारी महिन्यातील अवघे १५ दिवस संपलेले असताना आत्तापासूनच पूर्व हवेलीत उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.
पारा ३३.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याने दुपारी कडक ऊन तर, रात्री थंडी जाणवते आहे. दिवसा वातावरणातील उकाडा वाढत असल्याने आता उन्हाळ्याची चाहूल दिसू लागली आहे. तर रात्री थंडी पडत आहे. परिणामी या वातावरणामुळे आजारांचेही प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
सध्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ होत आहे. मागील दोन महिन्यांपासून थंडीचा कडाका वाढला असताना काही दिवसांपासून वातावरणातहि बदल झाला आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर, मफलर, कानटोप्या वापरावे लागत आहेत. दिवसभर उन्हाचा कडाका वाढत असल्याने टोप्या तसेच दुपट्ट्यांचाही वापर वाढला आहे.
मार्च महिन्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवते. परंतु, यंदा फेब्रुवारीत विचित्र असे वातावरण पूर्व हवेलीकरांना अनुभवायला मिळत आहे. रात्री थंडी जाणवत असल्याने स्वेटर घालावे लागते. तर, दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या उरुळी कांचन येथील महात्मा गांधी रोड, आश्रम रोड, ग्रामपंचायत शेजारील चौकात दुपारी कमी वर्दळ दिसून येते. उन्हापासून बचाव करण्यासाठी महिलांनी आपला मोर्चा आता स्कार्प आणि स्टॉलकडे वळवल्यामुळे विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे.
काय घ्याल काळजी…
हवामान बदलामुळे होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून बचावासाठी शक्यतो या काळात थंड व आंबट पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो ताजेच अन्न सेवन करावे. बाहेरील पदार्थ टाळावे. पाणी उकळून प्यावे. दिवसभर कोमटच पाण्याचे सेवन करावे. बालकांकडे विशेष लक्ष द्यावे.
ऋतुमानाचा बदल…
वातावरणातील बदल हा ऋतुमानाचा बदल (सिजनेबल चेंज) असला तरी मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतात. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. सध्या या समस्यांनी नागरिकांना ग्रासल्याचे पहावयास मिळत आहे. यापासून बचावासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.