पुणे : सप्टेंबरच्या सुरवातीपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसून आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाला तर पावसाने थैमान घातलं होतं. त्यानंतर काही दिवस पावसाने सुट्टी दिली. आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून आज म्हणजेच शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
आयएमडीने आपला अंदाज जाहीर केला आहे. अंदाजानुसार, आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात दिवसभर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय गडचिरोली, वाशिम, यवतमाळ तसेच आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार आहे.
मुंबईसह पुणे शहराला पावसाचा अलर्ट..
मुंबईसह पुणे शहराला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे शहराला आज नारंगी इशारा दिला आहे. शनिवारी पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच पुणेकरांची तारांबळ उडू शकते.
आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आजपासून पुढील ४ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता असून किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. रायगड, सातारा आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील ४ दिवस पावसाचे..
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, शनिवारी रायगड, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि यावल शहरातही पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसाची शक्यता आहे. रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.