पुणे : राज्यात सद्या पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या परतीच्या प्रवासादरम्यान राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या सरी तर काही भागात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात चांगलाच उकाडा वाढला असून अशातच हवामान खात्याने आज राज्यात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकताना आणखी गतिमान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल होणार असून काही भागात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज शनिवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. दरम्यान, सध्या काही भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (ता. १८) ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश तापमानाची नोंद झाली. तर अकोला, चंद्रपूर, अमरावती येथे ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. पुढील आठवडाभर राज्यात हवामानाची अशीच स्थिती राहिल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.