पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असून बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यामन सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट..
दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
‘या’ भागात जोरदार पावसाची हजेरी
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. काल रात्रीपासून या सर्व भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावंर पाणी साचलं होतं, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकलसेवा देखील उशीराने सुरु होती. दरम्यान, आजही मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस
नागपूर जिल्ह्यातही सद्या मुसळदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाल आहे. उमरेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून शेतामध्ये ही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाल्याचा प्राथमिक चित्र आहे. सोयाबीनची शेत आणि संत्र्याची बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली असून तळ्याचा स्वरूप बागेला आलेल आहे.