पुणे : राज्याच्या बहुतांश भागात विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. राज्यात आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस..
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यात शेती पिकांना फटका..
अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. अकोल्यात नदी आणि नाल्यांच्या पुराचं पाणी शेतात साचलं आहे. दरम्यान, अकोट तालुक्यात मागील 9 आणि 10 जुलैला ढगफुटीसदृश्य पाऊस पडला होता. त्यामुळं येथील शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं आहे. त्या नुकसानाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यात आता पुन्हा झालेल्या पावसामुळं शेत नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचल्याच चित्र आहे. त्यामुळं आता इथल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट उभं ठाकलं आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करताना दिसत आहे.
पाणी साठ्यात वाढ नाही..
पावसाळ्याचे दोन महिने संपत आले असले, तरीसुद्धा मराठवाड्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळं छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत. जायकवाडीसह येलदरी, लोअर, दुधना आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे.