पुणे : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली असल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. आज म्हणजेच शनिवारपासून पुढील 4-5 दिवस बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भ-मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईसह उपनगरातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा..
मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावरही पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी, असा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस होणार असून साधारणत: 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर अधिक वाढेल.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट..
आजपासून राज्यात सर्वदूर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगर, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुण्यातही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.