पुणे : राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अशातच आजही हवामान विभागाने काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावणारा आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज राजधानी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे तसेच कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या व मध्यम पावसाचा अलर्ट दिला आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खानदेशातील तिनही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ भागात जोरधार पावसाची शक्यता…
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या भागात उद्या वादळी वाऱ्यासह जोरधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्याही (शनिवार, १९, सप्टेंबर) राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.