पुणे : मागील आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर असून बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला तर कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा..
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार..
मागील आठवड्यात सांगली, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. मात्र, आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पजाबराव डख यांनी दिली आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोट, बुलढाणा,अचलपूर, वाशिम, अकोला, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, नाशिक, जळगाव, मालेगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.