पुणे : राज्याच्या बहुतांश भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आज पुणे, कोकण, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट
पुणे, रायगड,ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
पुणे शहरात मुसळधार..
पुणे शहरात काल गुरुवारी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मोठी दैना झालेली दिसून आली. विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तास मुसळधार पाऊस सुरु होता. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवासाची कसरत करावी लागली.
स्वारगेट, टिंबर मार्केट, गोळीबार मैदान, शिवाजीनगर, लोहगाव, पाषाण, चिंचवड, लवळे या भागात जोरदार पाऊस झाला. पुणे शहरासह घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय झाला आहे. शहरावर गेल्या तीन दिवसांपासून क्युम्युनोलिबस ढगांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. त्यामुळे कमी काळात मोठा पाऊस होत असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. शहराला 23 व 26 या दिवशी येलो, तर 24 व 25 रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.