पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे. राज्यात आगामी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवण्यात आले. या ठिकाणी 4.4 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तेरकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. लक्षद्वीप आणि मालदीव भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पंजाबमधील अदमपूर येथे 0.7 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. देशातील सपाट भूभागावरील हे नीचांकी तापमान आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र असून तापमानात घट होत आहे. मुंबई, पुण्यासह इतर भागात थंडी वाढत आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल आणि किमान तापमानात पुढील दोन दिवस कोणताही बदल होणार नसून त्यानंतर कमाल तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील निफाड, जळगाव, अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर येथे तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याची नोंद करण्यात आली आहे.