पुणे : राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी अनुभवायला मिळाली आहे. राज्यातील बहुतांनाश भागात मुसळधार पाऊस बघायला मिळाला. संपूर्ण कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून तलावांमधील पाणीसाठा वाढला आहे. आजचा रविवार सुद्धा राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार असून, अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई-पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रविवारी मुंबईसह उपनगर, पुणे, कोकण, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोल्हापूर साताऱ्यासह घाटमाथ्यावर सुद्धा तुफान पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राचा किनारा ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात सक्रिय आहे. त्यामुळे आज रविवारपासून पुढील 4-5 दिवसांत राज्यात मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.
‘या’ भागात ऑरेंज अलर्ट..
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मुंबई पालघऱ, ठाणे, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
नाशिकमध्ये पावसाची बॅटिंग..
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून 7000 क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आला. शनिवारी नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलं होतं. त्याचबरोबर पुरामुळे गोदा घाटावरचे छोटे-मोठे मंदिर पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर कायम राहिलास गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने गोदावरी नदीत वाढवणार पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला..
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्यात आला आहे. मुळा, मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाबा भिडे पूल देखील पाण्याखाली गेला असून पुण्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.