पुणे : मागील आठवडाभरापासून मोसमी पावसाची दौडघौड संथ गतीने होत आहे. कुठे पाउस आहेत तर कुठे कोरड. मात्र, आता अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढला असून, त्यामुळे पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात सहा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी पावसाने दहा जूनपर्यंत राज्यात वेगाने प्रगती केली होती. दहा जून रोजी मोसमी पाऊस जळगाव,चंद्रपुरा, अकोल्यात दाखल झाला होता. परंतु त्यानंतर मोसमी पाऊस तिथेच फिरत राहिला आहे.
आत्ता मोसमी पावसाची अरबी समुद्रावरील शाखा जोर धरत असून, अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे वेगाने किनारपट्टीकडे येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस संपूर्ण किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार असल्याचे व तसेच राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम क स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.