पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती अजूनही कायम असून पश्चिम बंगालच्या खाडीत तमिळनाडू, पदुचेरीजवळ फेंगल चक्रीवादळाचं सावट आहे. हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाले असून या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ हवामानाही स्थिती तयार होऊ शकते. एवढेच नाही तर सहा डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशीव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मोहर गळून पडण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. दुसरीकडे उत्तरेकडून गार वारे वाहात असून त्यामुळे महाराष्ट्रात शीत लहरींचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात कडाक्याची थंडी…
राज्यात कडाक्याची थंडी पडली असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. मुंबईमध्ये 16.5 अंश सेल्सिअस तापमानात नोंदवलं गेलं असून पुण्यात तापमानाचा पारा 9.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे मुंबईत गारठा वाढला आहे.
राज्यात निफाडमध्ये पारा 6 अंशापर्यंत…
राज्यात निफाडमध्ये पारा 6 अंशापर्यंत घसरला आहे. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात थंडीची तिव्रता अधिकाधिक वाढल्यानं पुणेकर चांगलेच कुडकुडले आहेत. शिवाजीनगरचे किमान तापमान 10 अंशांच्या खाली आलं आहे.