नवी दिल्ली : सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. देशात व्हॉट्सॲपचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगार या प्लॅटफॉर्मचा वापर करताना दिसत आहे. सायबर गुन्हेगार अज्ञात क्रमांकावरून तुम्हाला फसवण्यासाठी काही फेक मेसेज पाठवतात. हा संदेश नोकरीबद्दल देखील असू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत अनेक प्लॅटफॉर्म गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय देतात. काही प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर गुंतवणूक करण्यास देखील परवानगी देतात. याचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार गुंतवणुकीचे खोटे मेसेज तयार करून लोकांना पाठवतात. मेसेज खरा आहे की खोटा हे अनेकांना ओळखता येत नाही. चुकून अशा मेसेजवर क्लिक केल्यास डिव्हाईस हॅक होऊ शकतो. अनेकवेळा डिव्हाईसमध्ये असलेली माहिती चोरीला जाऊ शकते.
सायबर स्कॅमर अनेकदा व्हॉट्सॲपवर सवलत आणि सूट देणारे मेसेज पाठवतात. एखाद्याने चुकून अशा मेसेजवर क्लिक केल्यास धोकादायक मालवेअर त्यांच्या डिव्हाईसमध्ये प्रवेश करू शकतो. यानंतर, डिव्हाईसची सर्व माहिती जसे की बँकिंग आणि वैयक्तिक तपशील हॅकर्सपर्यंत पोहोचतात. त्यातून मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असते.