पुणे : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे शुक्रवारी संपूर्ण जगाला मोठ्या तांत्रिक संकटाचा सामना करावा लागला. दिल्ली, मुंबईसह परदेशातील विमानसेवेवरही याचा परिणाम झालेला दिसून आला. यामुळे जगभरातील व्यवहार कोलमडले होते. शनिवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असले तरी अब्जावधी ड़ॉलर्सचा फटका जगभरात बसला आहे.
यावेळी मायक्रोसॉफ्टने सांगितले की, क्राउडस्ट्राईक या सायबर सिक्युरिटी कंपनीच्या सॉफ्टवेअर अपडेटमध्ये समस्या निर्माण झाल्याचा परिणाम हा जगातील तब्बल 85 लाख विंडोज उपकरणांवर झाला आहे. विशेष म्हणजे हा आकडा एकूण वापरकर्त्यांच्या एक टक्के आहे असा दावा कंपनीने केला आहे.
जगातील अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये क्राउडस्ट्राईकचा वापर केला जातो. तसेच मायक्रोसॉफ्टने असेही सांगितलं आहे की, आम्ही 24 तास काम करत अशा समस्येवर आणि पुढील अपडेटवर काम करत आहोत. तसेच वापरकर्ते, ग्राहक यांना येणा-या अडचणींकडे लक्ष देत आहोत. त्यांची व्यवस्था सुरळीत सुरु राहण्याला प्राधान्य देत आहोत, असेही मायक्रोसॉफ्टने यावेळी स्पष्ट केले आहे.