पुणे प्राईम न्यूज: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आज जवळपास सर्वच क्षेत्रात वापरले जात आहे. एआय सहसा अंदाजासाठी वापरले जात नाही. परंतु, आता एआय हे देखील अंदाज वर्तवण्यास तयार आहे. एक नवीन संशोधन असा दावा करत आहे की, एआय 70 टक्के अचूकतेसह आगामी भूकंपांची माहिती देऊ शकते. संशोधनात म्हटले आहे की, एआय भूकंपाची माहिती एक आठवडा अगोदर देईल.
चीनमध्ये सात महिन्यांपासून चाचणी सुरू
ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाने एक एआय तयार केले आहे, ज्याला रिअल टाईममध्ये भूकंपाचा डेटा प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. प्रशिक्षणादरम्यान या एआयला भूकंपाचा जुना डेटा देण्यात आला. या एआयने चीनमध्ये सात महिन्यांच्या चाचणी दरम्यान एक आठवडा अगोदर 70 टक्के एवढा अचूक भूकंपांचा अंदाज दिला आहे. यामुळे भविष्यातील भूकंपांपासून होणारे नुकसान मर्यादित करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, अशी आशा निर्माण केली आहे.
एआयने 14 भूकंपांची भविष्यवाणी केली
अनेक आठवड्यांच्या संशोधनानंतर या एआयचे परिणाम जाहीर करण्यात आले आहेत. या एआय मॉडेलने एका आठवड्यापूर्वी सुमारे 200 मैलांच्या आत 14 भूकंपांची भविष्यवाणी केली होती. एआयने सांगितलेल्या तीव्रतेने भूकंप देखील झाले. या एआय मॉडेलचा एका भूकंपाबद्दलचा अंदाज चुकला. तसेच आठ वेळा दिलेला इशारा देखील खरा झाला नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ते आपले काम अचूकपणे करू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिका, इटली, जपान, ग्रीस, तुर्की आणि टेक्सासमध्ये भूकंप ट्रॅकिंग नेटवर्क सुधारण्यासाठी या एआयचा वापर केला जाऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.