नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Motorola ने भारतात आपला नवीन टॅब्लेट लाँच केला आहे. त्याचे नाव Moto Pad 60 PRO असे आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने स्टायलस असलेला स्वस्त स्मार्टफोन लाँच केला होता आणि आता कंपनीने स्टायलस असलेला टॅब्लेट आणला आहे.
Moto Pad 60 PRO या टॅब्लेटमध्ये 12.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोठ्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्झ आहे. या टॅबमध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 8300 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. त्याच्यासोबत 12GB पर्यंत रॅमही देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टॅबमध्ये 10200 mAh बॅटरीही असणार आहे, ज्यामुळे तो दीर्घकाळ टिकणारा टॅब्लेट बनू शकतो. Moto Pad 60 PRO च्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 26999 रुपये आहे.
तर 12GB + 256GB मॉडेलची किंमत 28999 रुपये असणार आहे. हे टॅब्लेट सध्या लाँच करण्यात आले असले तरी येत्या 23 एप्रिलपासून ऑनलाईन खरेदी करता येऊ शकणार आहे. ऑफलाईन स्टोअर्सवरूनही हा टॅब खरेदी करता येईल. हा टॅब पँटोन ब्रॉन्झ ग्रीन रंगात उपलब्ध असणार आहे.