नवी दिल्ली: क्राउडस्ट्राइकच्या खराबीमुळे, माइक्रोसॉफ्ट विंडोज कंप्यूटर वापरकर्त्यांना जगभरात समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे जगभरातील विमानसेवा ठप्प झाली आहे. याशिवाय बँका आणि शेअर बाजारांच्या कामकाजावरही याचा परिणाम होत आहे. क्राउडस्ट्राइकच्या अपडेटनंतर या समस्या सुरू झाल्या. क्राउडस्ट्राइकने त्रुटी मान्य केली आणि सांगितले, “आमचे अभियंते या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत आणि सपोर्ट तिकीट ओपन गरज नाही.” याशिवाय समस्या दूर होताच, त्याबाबत माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
क्राउडस्ट्राइक विंडोज पीसीसाठी प्रगत सायबर सुरक्षा उपाय प्रदान करते. विविध अहवालांनुसार, आउटेजमागील कारण म्हणजे त्यांचे मुख्य उत्पादन, फाल्कन. यामध्ये तांत्रिक त्रुटी आहे. विंडोज प्रणाली सुरक्षित करण्यासाठी ही एक प्रमुख संरक्षण प्रणाली आहे. यामुळेच जगभरातील युजर्सना आउटेजचा सामना करावा लागत आहे.
फाल्कन कसे कार्य करते?
क्राउडस्ट्राइकबद्दल थोडे अधिक समजून घेतल्यास, ही एक सायबर सुरक्षा कंपनी आहे, जी क्लाउड-आधारित एंडपॉइंट संरक्षण उपाय प्रदान करते. त्यांचे मुख्य उत्पादन Falcon आहे, जे नेटवर्क आणि एंडपॉइंट्सवर दुर्भावनापूर्ण फाइल्स आणि वर्तन शोधण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी AI तंत्रज्ञान वापरते. फाल्कन ऑनलाइन वा ऑफलाइन एंडपॉईंट सुरक्षा करू शकते. क्राउडस्ट्राइक असा दावा करते की, या कंपनीचे तंत्रज्ञान 99% मालवेअर धोके तुमच्या संस्थेवर किंवा वैयक्तिक डिव्हाइसवर प्रभाव टाकण्यापूर्वी शोधू शकते.
आउटेजमुळे, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि इतर देशांमधील व्यवसाय आणि लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आउटेजमुळे भारतातील अनेक शेअर बाजारातील खेळाडू, फ्लाइट ऑपरेटर आणि वृत्तसंस्था प्रभावित झाले. सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) एररमध्ये अडकलेल्या त्यांच्या स्क्रीनची छायाचित्रे देखील शेअर केली आहेत.