नवी दिल्ली : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या अॅप्सचा वापर वाढला आहे. त्यातच स्पॅम कॉल, मेसेज यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर कोणताही कॉन्टॅक्ट ब्लॉक करण्यासाठी सेव्ह न केलेला चॅट लिस्ट किंवा पर्सनल चॅट्स ओपन करून त्या कॉन्टॅक्टला ब्लॉक किंवा रिपोर्ट करावे लागायचे. पण, आता कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फिचर आणलंय. याचा फायदा लाखो युजर्सना होणार आहे.
या नवीन अपडेटसह व्हॉट्सअॅप न उघडता, पर्सनल चॅट्समध्ये न जाता एखाद्या कॉन्टॅक्टला नोटिफिकेशनद्वारे ब्लॉक किंवा रिपोर्ट करता येणार आहे. जेव्हा तुमच्या फोनमध्ये एखादा नंबर सेव्ह नसेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती, एखाद्या फ्रॉड कंपनीकडून तुम्हाला मेसेज आला असेल. तेव्हा व्हॉट्सअॅप तुम्हाला उत्तर देण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी स्क्रीनवर दोन नोटिफिकेशन देईल.
तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक करणे हा पहिला पर्याय निवडला, तर नेहमीप्रमाणे तुम्हाला यापुढे ती व्यक्ती मेसेज करू शकणार नाही. तसेच जर तुम्ही दुसरा पर्याय म्हणजे ‘ब्लॉक आणि रिपोर्ट करणे’ हा पर्याय निवडला. तर त्या व्यक्तीकडून पाठविण्यात आलेले शेवटचे पाच मेसेज कारवाईसाठी व्हॉट्सअॅपकडे पाठविले जातील.