नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, कंपन्यांकडून अनेक नवनवे फिचर्स उपलब्ध करून दिले जात आहेत. पण तुम्ही देखील गुगल मॅप्स वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, तुमचा हरवलेला स्मार्टफोन गुगल मॅप्सच्या मदतीने शोधता येणार आहे.
गुगल मॅप्सद्वारे अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही गॅजेट्सवर लाईव्ह लोकेशन शेअर करता येते. तुमच्याकडे गुगल मॅप्सचे अपडेटेड व्हर्जन आहे का याची सर्व प्रथम खात्री करा. गुगल मॅप उघडा. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा आणि लोकेशन शेअरिंग हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला ‘न्यू शेअर’ असे दिसेल, तिथे क्लिक करा आणि कालावधी, संपर्क किंवा प्लॅटफॉर्मसह तुमचे लोकेशन शेअर करा.
हे सर्व करत असताना इंटरनेट कनेक्शन सुरू असणं सर्वात महत्त्वाचं आहे. लोकेशन शेअर करण्यापूर्वी गुगल मॅप्स ॲपला लोकेशन शेअर करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की, इंटरनेट कनेक्शनसह स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून तुमच्या हरवलेल्या फोनचे लोकेशन ट्रॅक करण्यास मदत होईल. अशाप्रकारे तुम्ही गुगल मॅप्सद्वारे तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकता आणि तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधू शकता.