क्युपर्टिनो: जगभरातील मोबाईलप्रेमींची उत्सुकता संपवत ॲपल कंपनीने अखेर आपली बहुप्रतिक्षित iPhone 17 सीरिज बाजारात आणली आहे. या सिरीजमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या मॉडेल्सचा समावेश आहे. खास बाब म्हणजे, कंपनीने यावेळी ‘iPhone 17 Air’ हा सर्वात स्लिम आणि हलका फोन लाँच केला आहे.

या नवीन सिरीजमध्ये ॲपलने डिस्प्लेसह कॅमेरा आणि प्रोसेसरवरही विशेष लक्ष दिले आहे. या फोनमध्ये ‘A19’ चिप वापरण्यात आली आहे, जो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग अधिक जलद होतील, असा कंपनीचा दावा आहे.
नव्या iPhone 17 मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आता iPhone 17 मध्ये ‘120Hz ProMotion डिस्प्ले’ तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे वापरात असताना 10Hz ते 120Hz आणि लॉक स्क्रीनवर 1Hz पर्यंत आपोआप बदलते. यामुळे बॅटरीची बचत होते. तसेच, ‘ऑलवेज-ऑन’ फीचरमुळे स्क्रीन नेहमी चालू राहते, पण बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही.
कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर, iPhone 17 मध्ये आता 12-मेगापिक्सेल ऑप्टिकल दर्जाचा टेलिफोटो कॅमेरा आणि 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक फ्यूजन कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी कॅमेऱ्यात ‘सेंटर स्टेज फीचर’ आहे. यामुळे व्हिडिओ कॉल किंवा रेकॉर्डिंग करताना कॅमेरा वापरकर्त्याला आपोआप मध्यभागी ठेवतो, ज्यामुळे शॉट स्थिर मिळतो.
नवीन iPhone 17 सिरीज 5 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. लॅव्हेंडर, मिस्ट ब्लू, ब्लॅक, व्हाइट आणि सेज या रंगांचा समावेश आहे. या डिव्हाइसेसमध्ये ‘सिरेमिक शील्ड 2’ देण्यात आले आहे, जे मागील मॉडेल्सपेक्षा 3 पट जास्त मजबूत आहे.

किंमत आणि उपलब्धता (Price and Availability)
iPhone 17 सिरीजची किंमत भारतीय बाजारपेठेत 82,000 रुपयांपासून सुरू होते.
- iPhone 17: 256GB स्टोरेजसाठी याची किंमत 82,900 रुपये आहे. तर 512GB स्टोरेजसाठी 1,02,900 रुपये मोजावे लागतील.
- iPhone 17 Air: सर्वात पातळ असलेल्या या फोनची किंमत 256GB साठी 1,19,900 रुपये, 512GB साठी 1,39,900 रुपये, तर 1TB स्टोरेजसाठी 1,59,900 रुपये आहे.
- iPhone 17 Pro: याची किंमत 1,34,900 रुपये आहे.
- iPhone 17 Pro Max: याची किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरू होते.
ॲपलने या नवीन फोनसाठी Pre-order ची सुरुवात 12 सप्टेंबरपासून केली आहे, आणि हे फोन 19 सप्टेंबरपासून स्टोअरमध्ये उपलब्ध असतील.







