सध्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बेस्ट फीचर्स असणारे अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये देखील उपलब्ध आहेत. पण हेच स्मार्टफोन वापरताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जर योग्यप्रकारे काळजी घेतली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. त्यातच स्मार्टफोन हॅक होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षातील 20 पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट नुकतेच हॅक करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. खुद्द खासदारांबाबत असा प्रकार घडल्याने आता याचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या सुरक्षेविषयी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पण, या हॅकिंगच्या प्रकारामुळे सर्वसामान्यांपासून अगदी नेतेमंडळीही धास्तावले दिसत आहे. मात्र, अशा काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
‘ही’ लक्षणे दिसल्यास वाढू शकतो हॅकिंगचा धोका
जर तुमचा फोन सामान्यपेक्षा जास्त गरम होत असल्यास, ते हॅकिंग सॉफ्टवेअरमुळे होऊ शकते. त्यामुळे तुमचा फोन जास्त गरम होत असेल तर तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. याशिवाय, तुमच्या फोनवर अचानकपणे असे काही ऍप्स उघडले जात आहेत किंवा कॉल तर केला जात नाही ना, याची खात्री करून घ्यावे. तसे जर आपणांस आढळल्यास ते देखील हॅकिंगचे लक्षण असू शकते.
अज्ञात नंबरवरून मेसेज आल्यास…
तुम्हाला अज्ञात नंबरवरून संदेश किंवा पॉप-अप विंडो दिसत असेल तर हा देखील हॅकिंगचा प्रयत्न असू शकतो. तसेच चार्जिंग करूनही तुमचा फोन सातत्याने डिस्चार्ज होत असेल तर तोदेखील हॅकिंगचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. हॅकिंग सॉफ्टवेअर तुमच्या बॅटरीचा जास्त वापर करू शकते. तुम्ही सामान्यतः वापरता त्यापेक्षा जास्त डेटा वापरत असल्याचे तुम्हाला दिसत असल्यास, ते हॅकिंगचे लक्षण असू शकते.
हॅकिंगपासून वाचायचं असल्यास काय करावं?
कोणताही संशयास्पद मेसेज किंवा कॉल आल्यास सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुम्हाला मिळालेल्या संशयास्पद मेसेज किंवा कॉलवर प्रतिसाद देऊ नका आणि त्यातील लिंकवरही क्लिक करू नका. तुमच्या फोनवर अँटीव्हायरस आणि अँटी-मालवेअर ऍप इन्स्टॉल करा आणि नियमितपणे स्कॅन करा. फ्रीमध्ये मिळणारे असे ऍप वापरणे शक्य असल्यास टाळा. जर वापरायचेच असल्यास पेड अर्थात पैसे देऊन असलेले अॅप वापरल्यास चांगला पर्याय ठरू शकतो.
पासवर्डकडेही द्या लक्ष…
तुमचा फोन अथवा अकाउंट हॅक होण्यास सर्वात जास्त कारणीभूत ठरतो तो तुमचा पासवर्ड. पासवर्ड मजबूत आणि युनिक असणे गरजेचे आहे. तुमच्या सर्व अकाउंटसाठी एक स्ट्राँग पासवर्ड असावा. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेले Wi-Fi नेटवर्क वापरताना काळजी घ्या. कारण, या ठिकाणी अकाउंट हॅक होण्याचा धोका जास्त असतो.
हे कोड्स माहिती असणे गरजेचे…
स्मार्टफोन वापरताना काही कोड्सची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. *#21# हा कोड तुमचा कॉल किंवा फोन नंबर दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केला गेला आहे की नाही हे सांगण्यास फायद्याचा ठरू शकतो. कॉल-फॉरवर्ड प्रकारांना टाळता येऊ शकतो. #0# हा कोड वापरून तुम्ही फोनचा डिस्प्ले, स्पीकर, कॅमेरा आणि सेन्सरची कार्यक्षमता तपासू शकता.
##34971539## हा कोड वापरून तुम्ही तुमच्या फोनवरील कॅमेरा योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे तपासू शकता. *#07# तुमच्या फोनच्या SAR मूल्यासारखी माहिती देणारा USSD कोड अस्तित्वात आहे. हे मूल्य, सर्व फोनसाठी उपलब्ध आहे, डिव्हाईसद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनची पातळी दर्शवते.
तसेच *#06# हा क्रमांक दाबल्यास USSD कोड तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या फोनचा IMEI नंबर तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. जर तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास पोलिसांत तक्रार नोंदवण्याची आवश्यकता असल्यास हा क्रमांक उपयुक्त ठरतो. त्यामुळे या सर्व क्रमांकाची माहिती असणे गरजेचे आहे.