नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची आणि सरकारी कंपनी BSNL ने भारतात Satellite to Device सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू करणारी बीएसएनएल ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. या सेवेच्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसतानाही टेलिकॉम सेवा वापरू शकाल. यासाठी बीएसएनएलने अमेरिकन सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी वायसॅटसोबत भागीदारी केली आहे.
BSNL कंपनीने ‘इंडियन मोबाईल काँग्रेस 2024’ मध्ये आपली उपग्रह-आधारित द्वि-मार्ग संदेश सेवा यशस्वीरित्या प्रदर्शित केली होती. सॅटेलाईट-टू-डिव्हाईस सेवेच्या नावावरून आता हे स्पष्ट झाले आहे की, या प्रक्रियेत सॅटेलाईटच्या मदतीने डिव्हाईसला थेट सेवा दिली जाणार आहे. सध्या दूरसंचार सेवा वापरण्यासाठी दूरसंचार टॉवरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे अनेक दुर्गम भागात नेटवर्क मिळत नसते. अशा परिस्थितीत सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सेवेच्या मदतीने अशा भागातील लोकांना कनेक्टिव्हिटीचे चांगले पर्याय उपलब्ध होतील.
दूरसंचार विभागाने (DoT) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल पोस्ट केले आहे. DoT ने लिहिले, ‘BSNL ने देशातील पहिली सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सेवा सुरू केली आहे. आता भारतातील दुर्गम भागातही कनेक्टिव्हिटी सहज उपलब्ध होणार आहे. या संदेशासोबत दूरसंचार विभागाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये या सेवेबाबत सर्वच माहिती सांगितली आहे.