नवी दिल्ली : सध्या विविध मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून आपापल्या ग्राहकांसाठी MNP अर्थात ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’चा पर्याय दिला जातो. म्हणजे जर एखाद्या कंपनीची सेवा आपल्याला आवडली नसेल तर मोबाईल नंबर तोच ठेऊन दुसरी कंपनी घेता येते. यासाठी आधी जास्त दिवस लागायचे पण आता यात बदल केला जाणार आहे.
आता सिम बदलल्यानंतर मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. हा नवा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. दूरसंचार नियामक ट्रायने मोबाईल फोन नंबरद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी 10 दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. पण या नव्या नियमाचा फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने 14 मार्च 2024 रोजी नियामकाने जारी केलेले दूरसंचार मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (नववी दुरुस्ती) नियम 1 जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे. या नियमांद्वारे, युनिक पोर्टिंग कोड (UPC) च्या वाटपाची विनंती नाकारण्यासाठी अतिरिक्त निकष लागू करण्यात आला आहे, असे नियामकाने सांगितले.