नवी दिल्ली : सध्या Google Chrome, Mozilla Firefox, Safari, Opera यांसारखे वेब ब्राऊजर उपलब्ध आहेत. यातील बहुतेक ब्राऊजर सुपरफास्ट देखील वाटतात. त्यात तुम्ही Mozilla Firefox वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते. कारण, आता हॅकर्सचा तुमच्यावर डोळा असू शकतो.
‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (CERT-In) ने Mozilla Firefox युजर्ससाठी एक इशारा दिला आहे. CERT-In ने Mozilla Firefox या वेब ब्राउझरमध्ये उपस्थित असलेल्या अनेक त्रुटींचा उल्लेख केला आहे. यासोबतच सरकारी एजन्सीने युजर्संना त्यांच्या डिव्हाईसेसच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर सतर्क राहण्यास सांगितले आहे.
त्यात म्हटले आहे की, हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन युजर्संना महत्त्वाचा डेटा चोरू शकतात. CERT-In ने जारी केलेली सल्लागार टीप CIVN-2024-0317 मध्ये फायरफॉक्स, फायरफॉक्स ESR आणि थंडरबर्ड सारख्या Mozilla च्या इतर उत्पादनांमध्ये असलेल्या त्रुटींचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे हे वापरताना सुरक्षेची विशिष्ट काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.