नवी दिल्ली : भारती एअरटेलच्या यूझर्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून वाचवण्यासाठी कंपनीकडून एक विशेष प्रोग्राम हाती घेण्यात आला आहे. बनावट कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी भारती एअरटेल आपल्या नेटवर्कवर आर्टिफिशियल इंटेलीजेंस बेस्ड टेक्नॉलॉजी लागू करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोपाल विठ्ठल म्हणाले की, हे तंत्रज्ञान 26 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू केले जाईल, जे यूझर्सना संभाव्य बनावट (स्पॅम) कॉल आणि संदेशांबद्दल सावधान करेल.
कंपनीचे सीईओ पुढे म्हणाले की, ‘असे अनेक इंडिकेटर आहेत ज्यांच्या आधारे आम्ही या बनावट टोळ्या चालवणाऱ्यांची ओळख पटवली आहे. आम्ही AI वर चालणारे ‘स्पॅम डिटेक्शन’ सोल्यूशन विकसित केले आहे. ते दोन मिलिसेकंदांमध्ये कॉलचे विश्लेषण करते आणि डायलरवरील यूझर्सना सतर्क करते.
अशी असेल मोफत सेवा..
एअरटेलच्या सर्व स्मार्टफोन यूझर्ससाठी ही सुविधा मोफत असणार आहे. विठ्ठल म्हणाले की हे तंत्रज्ञान कॉल स्वतःच ब्लॉक करणार नाही, परंतु ते ब्लॉक करण्याचा निर्णय यूझर्सला घ्यावा लागेल, कारण कधीकधी वास्तविक कॉल देखील बनावट कॉल असल्याचे दाखवले जात असतात. अलीकडेच एअरटेलने आपल्या यादीत 26 रुपयांचा नवीन प्लॅन समाविष्ट केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. कंपनीने हा प्लॅन आपल्या ‘डेटा पॅक’च्या लिस्टमध्ये ठेवला आहे. मात्र, या प्लॅनची व्हॅलिडिटी केवळ एका दिवसासाठी असणार आहे.